ह्या ब्लॉगचे नाव पाहिल्यावर तुमच्या मनात पहिला प्रश्न नक्की काय आला असेल हे मला माहीत आहे. काय खरं आहे की नाही? असो, कोणीतरी म्हणालच आहे ना की नावात काय आहे म्हणून? पण खरंच विचार केला ना की नक्की पटेल की नावतच सर्व काही येतं ते!
आजपर्यंत "मन" ह्या गोष्टीवर अनेकांनी फार छान, सुंदर लिहिले आहे, त्यामुळे मी परत काही सांगावे किंवा लिहावे असे काही नाही (म्हणजे मला त्यापेक्षा जास्त माहीत आहे असे मला म्हणायचे नाही, आणि माझी तशी पात्रता पण नाही). इथे आपले स्वत:चे विचार मांडावे हा एक प्रामाणिक प्रयत्न.
"मना" बद्दल विचार केला म्हणजे मला बहिणाबाईची ती कविता नेहमी आठवते. "मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर, किती हाकलं हाकलं फिरी येती पिकांवर्". आपण कधी असा विचार केला का, की हे मन जर खरंच स्थिर असतं तर काय झालं असतं? आपण ही जी सर्व प्रगती केली आहे ती सर्व शक्य झालीच नसती कदाचित!
आपण रोज दिवासातले चोवीस तास वेगवेगळ्या भूमिका निभावत असतो, कधी आईची, तर कधी बापाची. कधी बायकोची तर कधी नवरय़ाची. कधी ऑफीस मधे साहेबाची, तर कधी कर्मच्रारी म्हणून. प्रत्येक वेळी माणूस तोच पण भूमिका वेगवेगळ्या! म्हणजे ते एकच "मन" सगळीकडे वेग वेगळे रूप घेऊन वावरत असते, आणि हे सगळे अचूक, अव्याहतपणे चालू असते. मग आपण हे मन स्थिर आहे असे म्हणू शकत नाही.
बरय़ाच वेळा आपण घरात, बाहेर कधीतरी म्हणतच असतो की, "अरे काय हे? अरे तुझे डोकं ठिकाणावर आहे ना?", "अरे काय हे? "तुला असा एका अंगाने विचार का करता येत नाही?" (नवरा-बायको मधले टिपिकल संवाद). इथे जर आपण वरील गोष्टीचा (म्हणजे मनाच्या वेगवेगळ्या भूमिकांचा) संदर्भ घेतला तर हे मात्र पटेल की हे प्रश्न किती निरर्थक आहेत ते! तरी पण हे प्रश्न काही संपणार नाहीत आणि संवादही. असो हा ह्या लेखाचा विषय नाही.
माझ्या मते आपले मन हे दोन प्रकारचे आहे. एक आंतरिक आणि दुसरे बाह्य. आंतरिक मनात मनुष्याच्या स्वताच्या आकांक्षा/अपेक्षा या गोष्टींचे मंथन चालू असते. ह्यात त्या माणसाने केलेल्या असंख्य तडजोडींचा आणि त्यातून पुन:निर्मित होणार्या आकांक्षा/अपेक्षा यांचा अविरत संघर्ष चालू असतो. माझ्या मते ह्या संघर्षात फक्त तो एकटाच, आणि अगदी एकटाच सहभागी/जबाबदार असतो. अगदी त्या माणसाच्या सर्वात जवळच्या व्यक्तीला सुद्धा (कधी कधी) ते माहीत नसते (मी हा अनुभव त्या त्या व्यक्ती वर सोपवतो). अशा वेळेस एखाद्याचे मन वाचता आले असते तर किती बरे झाले असते, असे बारर्याचदा वाटते नाही? मध्यंतरी मला कोणीतरी म्हणाले होते की, "माझ्या मनात काय चालू आहे ते जर आपोआप लिहून काढता आले असते तर किती बरे झाले असते."
बाह्य मनात आपली सर्व नाती-गोती, व्यावहारिक संबंध ह्या गोष्टींचा अंतर्भाव होतो. इथे आपण बहुतेक सर्व वेळेस आपले विचार सर्वांना सांगत असतो आणि इतरांचे विचार ऐकत असतो. यात स्वत:चे असे काही नसते. परंतु इथे सुद्धा विचारांची संघर्ष प्रक्रिया ही चालूच असते.
तर वर लिहिल्या प्रमाणे जर आपण पहिले तर हे पटेल की, मन हे स्थिर हे नक्की नाही. ते घड्यळासारखे अविरत फिरणारे एक चक्र आहे. निष्काम, निष्कलंक! स्थिर आहे तो आपला मनाकडे (स्वत:च्या आणि इतरांच्या) बघण्याचा दृष्टिकोन!
-- एक (अ)-स्थिर मनकवडा.
Sunday, December 2, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
बरोबर आहे, मन अस्थिरच असूदे, म्हणजे असाच ब्लॉगत राहशील :)
Post a Comment